मुंबई : कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसोबतच कृषी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे इतर फायदे मिळावेत यासाठी या पदवीला व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा देण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी सांगितले.
मंत्रालयात आज कृषी व्यवसाय व्यवस्थापन या पदवीला व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा मिळवून देण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी व संस्थाचालक प्रतिनिधी यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात नऊ कृषी अभ्यासक्रम असून कृषी परिषदेमार्फत आठ अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा देण्यात आला आहे. परंतु कृषी व्यवसाय व्यवस्थापन या पदवीला व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कृषी सेवा केंद्राचे प्रमाणपत्र, स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग असे अभ्यासक्रमाचे इतर फायदे मिळत नसल्याचे विद्यार्थी व संस्थाचालक प्रतिनिधींनी सांगितले. त्यामुळे या कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाला व्यावसायिक दर्जा देऊन याबाबतचा शासन निर्णय तातडीने निर्गमित करण्यात यावा अशा सूचना कृषिमंत्री डॉ.बोंडे यांनी यावेळी दिल्या.
बैठकीस महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजित माने व संचालक शिक्षण डॉ.हरिहर कौसडीकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अध्यक्ष श्री.फरांदे, एबीएम महाविद्यालयाचे संचालक प्रशांत कदम तसेच विद्यार्थी व संस्थाचालक प्रतिनिधी उपस्थित होते.