मराठा समाजाच्या मागण्यांसाठी १६ जूनपासून कोल्हापूरात आंदोलन
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी १६ जूनपासून कोल्हापूरात आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे. राज्यभरातले मराठा समन्वयक यासाठी जमा होतील आणि त्यानंतर राज्यातल्या ३६ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती मराठा समन्वयकांनी दिली आहे. ते आज रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये बोलत होते.
राज्य सरकारकडे या मागण्या आधीच सोपविल्या आहेत. त्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू असेल, असंही त्यांनी सांगितलं. गरज पडल्यास पुणे ते मुंबई दरम्यान मोर्चा काढला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
हे आंदोलन कुठल्याही पक्षाच्या विरोधात नसून केवळ मराठा आरक्षणासाठी असल्याचं खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी येत्या १६ जून रोजी पहिला मोर्चा काढणार असल्याची घोषणा खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आज रायगडावरून केली होती.
शिवाजी महाराजांचा ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा आज परंपरागत पध्दतीनं आणि मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात साजरा झाला. यावेळी संभाजी राजे आणि त्यांचे पुत्र शहाजी राजे यांनी महाराजांच्या उत्सव मूर्तीवर सुवर्णहोनांनी अभिषेक केला.
शिवराज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी संपूर्ण रायगड आणि किल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता