Site icon साप्ताहिक एकच ध्येय

खरीप पिकांच्या किमान हमी भावात वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१-२२ या खरीप विपणन वर्षासाठी खरीप पिकांच्या किमान हमी भावात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळानें बुधवारी घेतला. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य किंमत मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं तोमर यावेळी म्हणाले. तीळाच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त म्हणजे ४५२ रुपये प्रती क्विंटल इतकी वाढ करण्यात आली आहे. तुरीच्या आणि उडीदाच्या भावात ३०० रुपये प्रती क्विंटल, भुईमुगाच्या किमतीत २६५ रुपये प्रती क्विंटल, कारळ्याच्या किमतीत २३५ रुपये प्रती क्विंटल इतकी वाढ करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन किमान खर्चाच्या दीड पट किमान हमी भाव मिळावा अशी संकल्पना २०१८-१९ च्या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आली होती; त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आल्याचं तोमर यांनी सांगितलं.

रेल्वे स्थानकं आणि रेल्वे गाड्यांमध्ये सार्वजनिक सुरक्षा आणि सुरक्षिततेसंबंधी सेवांसाठी ६०० मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी बँडमधल्या ५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठी देखील केंद्रीय मंत्रीमंडळानं काल मंजुरी दिली. या स्पेक्ट्रम बरोबरच दीर्घकालीन विकास आणि रेल्वे मार्गांवर मोबाइल ट्रेन रेडीओ संवाद प्रणाली लागू करण्याची रेल्वेची योजना आहे.

ही योजना पुढील ५ वर्षात पूर्ण होण्याची शक्यता असून यासाठी २५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुरक्षिततेसंबधीच्या सेवांसाठी विश्वसनीय आवाज, व्हिडीओ आणि डेटा उपलब्ध करून देणं हा या योजनेचा हेतू आहे. आधुनिक सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे सुरक्षा यंत्रणेत याचा उपयोग केला जाईल. त्याचबरोबर लोको पायलट आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुरळीत संपर्क होण्यासाठी देखील ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Exit mobile version