Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना निर्बंध कायम

पिंपरी : कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने पिंपरी चिंचवड शहरात निर्बंध कायम ठेवण्यात आले असून यामध्ये कोणतीही शिथीलता करण्यात आलेली नाही अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.  पुण्यातील कौन्सिल हॉल येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पाच स्तर निश्चित केले आहेत. या पाचही स्तरांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत, त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची प्रमाण विचारात घेता शहरातील निर्बंध जैसे थे ठेवण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला.  पुणे शहरातील पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या पेक्षा कमी असल्याने शहरातील बंधने काही प्रमाणात शिथिल करण्यात आली. मात्र पिंपरी चिंचवड शहराचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने निर्बंधामध्ये शिथिलता दिलेली नाही.

पॉझिटिव्हीटी रेट विचारात घेवूनच निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला जात आहे. पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत असेल तर निर्बंध शिथिल केले जाणार होते.  मात्र पिंपरी चिंचवड शहराचा मागील आठवड्यातील पॉझिटिव्हीटी रेट ५.२ टक्के होता.  हा रेट ५ टक्क्यांपेक्षा थोडासा जास्त असल्याने निर्बंध आणखी शिथिल केले नाहीत अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.  शहरातील कोरोना रुग्णसंख्या घटत असली तरी राज्यशासनाच्या आदेशानुसार पॉझिटिव्हीटी रेट विचारात घेऊन शहरातील निर्बंधामध्ये आणखी शिथिलता देण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान शहरात सध्याच्या नियमावलीत कोणताही बदल नाही  असे आयुक्त पाटील यांनी स्पष्ट  केले व तसे लेखी आदेशदेखील निर्गमित करण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोना दक्षता नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Exit mobile version