मुख्यमंत्र्यांनी साधला विदर्भ आणि मराठवाड्याच्या १९ जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद
गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास
मुंबई : प्रत्येक गावाची एक ग्रामभाषा असते, या भाषेच्या माध्यमातून तसेच वासुदेव, वाघ्या- मुरळी यांच्या माध्यमातून गावात कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती करावी, दवंडीचा उपयोग करावा असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची तिसरी लाट गावात येणार की नाही हे कोरोनाला न ठरवू देता गावांनी यासंबंधीचा निर्णय घेऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, सततची सावधानता बाळगत नियमांचे पालन करावे आणि आपली गावे कोरोनामुक्त ठेवावीत, असे आवाहन सरपंचांना केले.
या संवादादरम्यान उपस्थित सरपंचांनी त्यांच्या कोरोनामुक्त गावाच्या वाटचालीची माहिती देत केलेले प्रयत्न, उपाययोजना आणि राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम मुख्यमंत्र्यांना सांगितले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील 19 जिल्ह्यांतील सरपंचांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पद्मश्री पोपटराव पवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह राज्य टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ.संजय ओक, डॉ.शशांक जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

जनहितासाठी समाजमाध्यमांचा उपयोग
मुख्यमंत्र्यांनी सर्व सरपंचांचा माझे सहकारी असा उल्लेख करून पुढे म्हटले की, आपण सर्वांनी गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी अतिशय चांगले काम केले आहे, त्यासाठी खूप नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, मी तुम्हाला सूचना देण्यापेक्षा तुम्ही केलेल्या कामातूनच मला खूप चांगली माहिती मिळाली आहे ज्याचा राज्यभरासाठी उपयोग करता येईल. आपण सर्वजण जनहितासाठी समाजमाध्यमांचाही खूप चांगल्याप्रकारे उपयोग करून घेत आहात. व्हॉटसअप ग्रुप निर्माण करत त्याद्वारे माहितीची देवाण घेवाण करत आहात, जनजागृती करत आहात. ही कामे खरच खूप कौतुकास्पद आहेत.
