कोविड उपचारासाठीची ओषधं आणि उपकरणांच्या वस्तु आणि सेवाकरात सुट
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड आजारातल्या उपचारांसाठी लागणाऱ्या अनेक औषधांना आणि उपचार सुविधांना वस्तु आणि सेवाकरात सुट देण्याच्या मंत्रीगटानं केलेल्या शिफारशी आज झालेल्या वस्तु आणि सेवा कर परिषदेत स्वीकारल्या आहेत. वित्त मंत्री निर्मला सितारामन यांनी या परिषदेनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली.
काळ्या बुरशीच्या उपचारात वापरण्यात येणारे एमफोटेरिसिन बी आणि संसर्ग रोखणाऱ्या टोसिलिजमैब या औषधांना जीएसटी कराच्या सुचीतून वगळण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.
रेमेडिसीवर इंजेक्शन वरचा जीएसटी बारा टक्क्यांवरुन पाच टक्क्यांवर आणला असून आरोग्य मंत्रालयानं सांगितलेल्या कोविड उपचारातल्या इतरही काही औषधांचा जीएसटी पाच टक्के करण्यात आला आहे.
वैद्यकिय उपचारासाठी लागणारा ऑक्सीजन आणि इतर उपकरणांबरोबरच ऑक्सीमिटर आणि सँनिटायझर वरील वस्तू आणि सेवा कर पाच टक्के करण्यात आला आहे.
विद्युत आणि गॅस शव दाहिनी वरचा जीएस टीही १८ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आल्याची घोषणा या वेळी वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी केली आहे. जीएसटी परिषदेची ही ४४ वी बैठक होती.