नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रासायनिक कीडनाशकांचा देशांतर्गत वापर थांबवण्याबाबत स्वित्झर्लंड आज सार्वमत घेत आहे. येत्या १० वर्षात रासायनिक कीडनाशकांचा वापर पूर्णपणे थांबवण्याचे स्वित्झर्लंडचे उद्दिष्ट आहे. सध्या जगात भूतान या एकमेव देशात रसायनांच्या वापरावर बंदी आहे. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी, कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी तसंच कोविड-१९ साठी तातडीच्या निधीच्या मंजुरीसाठीही स्वित्झर्लंड मध्ये सार्वमत अनिवार्य आहे. मंजुरीनंतर घटनेमध्ये योग्य तो बदल करण्यात येईल. याच्या अंमलबजावणीसंबंधीचे कायदे संसदेपुढे ठेवण्यासाठी सरकार काम करत आहे.
रासायनिक कीडनाशकांवरील बंदीच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार या क्षेत्रातील, स्वित्झर्लंडमधील सिंजेंटा तसंच जर्मनीमधील बायर आणि BASF या मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनामुळं लोकांचे आरोग्य तसंच पर्यावरणाची हानी होत आहे. पेस्टीसाईडस इनिशिएटिव्ह च्या सह लेखिका अँट्वनेट गिलसन यांनीही रासायनिक कीडनाशकांमुळं लोकांचं आरोग्य धोक्यात येत असल्यानं तसंच भविष्यात निर्माण होणाऱ्या धोक्यांमुळं यांचा वापर थांबवणं गरजेचं असल्याचं म्हंटलं आहे. कीडनाशक उत्पादक कंपन्यांच्या म्हणण्यानुसार मात्र त्यांची उत्पादनं काटेकोर तपासणी करून कायद्याच्या चौकटीत उत्पादित केली जातात आणि त्यांचा वापर थांबवल्यास पीक उत्पादन कमी होईल.
रसायनांचा परिणाम पिण्याच्या पाण्यावरही होत असून रसायनांचा वापर न करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या निर्णयाबाबतही मतदान होणार आहे.