मुंबई : मत्स्यव्यवसायाचा एकात्मिक विकास, मत्स्योत्पादनात वाढ तसेच मच्छिमारांचे कल्याण या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या नीलक्रांती योजनेद्वारे सुमारे 3 लाख 24 हजार मच्छिमारांना विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. मागील तीन वर्षात नीलक्रांती योजनेमध्ये 53 कोटी 21 लाख रुपयांचा प्रत्यक्ष खर्च करण्यात आला आहे.
नीलक्रांतीं योजनेमुळे मत्स्यव्यवसायाला चालना मिळाली असून या योजनेअंतर्गत 4 हजार 613 लाभार्थींना लाभ देण्यात आला. पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनासाठी 218 लाभार्थींना 2 हजार 605 पिंजरे वाटप करण्यात आले. 2 हजार 664 मच्छिमारांना सुरक्षिततेची साधणे (डिस्ट्रेस अलर्ट ट्रान्समीटर- डीएटी) पुरविण्यात आली. 1 हजार 769 लाभार्थींना बचत-नि-मदत योजनेचा लाभ देण्यात आला.
तीन वर्षात 1200 लाभार्थींना मत्स्यव्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. नीलक्रांती योजनेंतर्गत नौका व जाळीवाटप, भारतीय प्रमुख कार्प मत्स्यबीज उत्पादन केंद्र, बर्फ कारखाना, मत्स्यखाद्य कारखाना, नवीन मत्स्यतळी बांधकाम, ऑटो रिक्षासह शितपेटी, मोटर सायकलसह शितपेटी, घरकुल बांधकाम आदी योजनांनाही अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे.