मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात पण कोरोना प्रतिबंधक नियम पाळून साजरा होतो आहे. यानिनिमित्तानं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं राज्यात मुंबईतलं नेहरू विज्ञान केंद्र आणि कान्हेरी गुफा, पुण्यात आगा खान पॅलेस, नागपुरातली उच्च न्यायालयाची जुनी ईमारत आणि औरंगाबाद इथं योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय राज्यात २ हजार ७००हून अधिक ठिकाणी योगविषयक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं.
मुंबईत कान्हेरी गुफा इथं झालेल्या कार्यक्रमात योग प्राशिक्षिका शुभांगी लाटकर यांनी योग साधना करून सुरुवात केली. यावेळी नृत्यवंदनेचा कार्यक्रमही झाला.नागपूर इथल्या उच्च न्यायालयाच्या जुन्या ईमारत परिसरात झालेल्या योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह शहरातल्या मान्यवर व्यक्तींनी सहभाग घेतला. गडकरी यांनी योगसाधना आणि योगाचे विविध व्यायाम केले, तसेच देशवासियांना योग दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. नागरिकांनी योगासनं करत आपलं आरोग्य निरोगी ठेवावं असं आवाहनही गडकरी यांनी केलं.
योगदिनानिमित्त गडकरी यांच्या हस्ते वृक्षारोपणही झालं.योग दिनानिमित्त मुंबईत राजभवनातही योग प्रात्यक्षिक कार्यक्रम झाला. यावळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सहभागी होत योगासनं केली. राजभवनातले अधिकारी आणि कर्मचारीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.मुंबईत सांताक्रूझ इथल्या ‘द योगा इन्स्टिट्युटमध्येही या संस्थेच्या अध्यक्षा हंसा जयदेवा यांच्या मार्गदर्शनाखाली योगवर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. योद दिनानिमीत्त धुळ्यात, ऑफिसर क्लबच्या वतीनं धुळे जिमखान्यात कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सहभागी होत योग प्रात्यक्षिकं केली. जिल्ह्यातल्या गरुड मैदानावरही आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. वाशीम जिल्ह्यातही ठिकठिकाणी कोरोना प्रतिबंधक निमांचं पालन करून योग प्रात्यिक्षिक कार्यक्रमांचं आयोजन केले गेले.