मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुक्ति असलेल्या आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावांमधे इयत्ता १०/१२ वी चे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता तपासून पहावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक काल झाली. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभाग प्रस्तावित करत आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. त्यावर, यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. बारावीच्या विद्यार्थ्यांचं गुण मूल्यांकन करतांना, सीबीएससी बोर्डानं जाहीर केलेल्या मूल्यांकनाच्या धर्तीवर, तसंच राज्यानं इयत्ता १० वी साठी निश्चित केलेल्या मूल्यांकन पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करून प्रस्ताव सादर करावा असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.