मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसींच्या राजकीय आरक्षण पुनर्स्थापित व्हावं यासाठी भारतीय जनता पक्षानं आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं.
मुंबईत मंत्रालय परिसरात गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं. मुलुंड चेक नाका इथं झालेल्या आंदोलनात आमदार आशिष शेलार, खासदार मनोज कोटक सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. सायन – पनवेल मार्गावरही आज भाजपने चक्का जाम आंदोलन केले.
रायगड जिल्ह्यातल्या कळंबोली इथे झालेल्या या आंदोलनात सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
पालघरमध्येही चार रस्ता इथं काही काळ चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
सिंधुदुर्गातही कुडाळ इथं माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणेआज भाजपच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. जळगाव शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी आकाशवाणी चौकात चक्काजाम आंदोलन केलं.
बीडमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वात परळी इथं आंदोलन झालं. राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून बहुजन समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला.
बुलडाण्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या खामगाव-अकोला रोडवरवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं त्यामुळे या मार्गावरची वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती
धुळ्यातील चाळीसगाव चौफुलीवर भाजप खासदार सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी सुमारे तासभर घोषणाबाजी करीत महामार्ग अडवला.
गोंदियात राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी बैलगाडी मोर्चा काढत कोहमारा इथला मुंबई – हावडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ रोखून धरला.
परभणीतल्या भाजपाच्या महानगर जिल्हा शाखेनं जिंतूर रस्त्यावरच्या महाराणा प्रताप चौकात रास्तारोको केला.
जालना शहरात संतोष दानवे यांच्या नेतृत्त्वाखाली, अहमदनगर जिल्ह्यात खासदार डॉ सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली तर चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सत्ताधारी पक्ष विनाकारण केंद्र सरकारवर तोंडसुख घेत असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी यावेळी केला. अनुसुचित जाती जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी आरक्षण हक्क कृती समिती, विविध राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी वाशीमी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.
केंद्र सरकारकडे सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसींची माहिती मागूनही ती दिली नाही. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असं म्हणत काँग्रेसनही राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केलं. नाशिकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. नवी मुंबईत नेरूळ तालुका ब्लॉक कॉंग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नेरूळ सेक्टर २ मध्ये रस्त्यावर निदर्शनं केली.