Site icon साप्ताहिक एकच ध्येय

संयुक्त कुष्ठरुग्ण शोध व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम-डॉ.हुकुमचंद पाटोळे

पुणे : पुणे जिल्हयात 13 ते 28 सप्टेंबर 2019 या कालावधीत संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान, सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम व असंसर्गजन्यरोग प्रतिबंध जागरुकता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या यश्स्वीतेसाठी संबंधीत सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांनी  सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. हुकुमचंद पाटोळे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान, सक्रीय क्षयरुग्न शोध मोहिम व असंसर्गजन्यरोग प्रतिबंध जागरुकता अभियानासंदर्भात आयोजित बैठकीत श्री.पाटोळे बोलत होते यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.संजय दराडे, अभियानाचे समन्वयक डॉ.बसवराज पाटील, अतिरिक्त जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ.सचिन खरात, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगदाळे, जिल्हा पर्यवेक्षक दिनेश कुकडे आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.पाटोळे म्हणाले, पुणे जिल्हयात 13 ते 28 सप्टेंबर 2019 या कालावधीत संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान, सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम व असंसर्गजन्यरोग प्रतिबंध जागरुकता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात आशा व पुरुष स्वयंसेवक यांच्यामार्फत घरातील सर्व व्यक्तींची तपासणी करुन संशयीत रुग्ण शोधले जाणार आहेत. शोधण्यात आलेल्या संशयीत रुग्णांची त्वरित वैद्यकीय अधिकारी यांच्याव्दारे तपासणी करुन त्यांना योग्य औषधोपचार सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.संजय दराडे यांनी या अभियानासाठी तालुकास्तरीय कृती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. हे अभियान पुणे जिल्हयातील 13 तालुक्यांत राबविण्यात येणार आहे. नागरी भागातील झोपडपट्टी, स्थलांतरीत लोकसंख्या असणाऱ्या भागात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत एकुण 14 दिवसाच्या सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले असल्याचे डॉ.दराडे यांनी सांगितले. 

यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version