नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गावांमधल्या प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करणं हेच प्रत्येक गावाचं लक्ष्य असायला हवं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात गैरसमज आहेत, ते दूर करण्यासाठी आपण प्रत्येकानं जागरुक रहावं आणि प्रत्येकाला जागरुक करावं असंही त्यांनी म्हटलं आहे.
प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा अठ्ठ्यात्तरावा भाग होता. कोविड प्रतिबंधक लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनातले गैरसमज दूर करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी मध्यप्रदेशातल्या डुलारिया गावातल्या काही व्यक्तींशी संवादही साधला.
भारतानं एकाच दिवसात ८६ लाखापेक्षा अधिक जणांचं लसीकरण केल्याच्या कामगिरीचा उल्लेख करत, आपण एका दिवसात लाखो लोकांना भारतात बनवलेली लस विनामूल्य देत आहोत, हे नव्या भारताचं सामर्थ्य असल्याचं ते म्हणाले.
कोरोनाच्या संकटातही भारताच्या गावांमधले लोक आदिवासी बांधवांनी दाखवलेला संमजसपणा आणि सामर्थ्य हा जगासाठी भविष्यात अभ्यासाचा विषय ठरेल असं ते म्हणाले.
निरंतरता आणि सातत्य हाच निर्णायक सफलतेचा मंत्र आहे. म्हणूनच कोणत्याही भ्रमाशिवाय आणि शिथील न राहता अखंड प्रयत्न करत आपल्याला कोरोनावर विजय मिळवायचा आहे, असं ते म्हणाले.
कोरोनाशी झुंझ अपयशी ठरलेल्या, मात्र कोरोनाबाधित असतानाही रुग्णालयातूनच देशात ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा सुरळीत राहण्यासाठी अखेरपर्यंत काम केलेल्या डॉ. गुरुप्रसाद मोहपात्रा यांचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. त्यांच्याप्रमाणेच विविध क्षेत्राल्या असंख्य लोकांनी आणि नागरिकांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं ते म्हणाले. कोविड विषयीच्या नियमांचं पालन करणं आणि लस घेणं हीच अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आपली श्रद्धांजली ठरेल असं ते म्हणाले.
डॉक्टर बीसी राय यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी साजरा होत असलेल्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाचा उल्लेख करून, कोरोना काळात डॉक्टरांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी देशभरातल्या डॉक्टरांचे आभार मानले.
कोरोनामुळे निधन झालेले भारताचे महान धावपट्टू मिल्खा सिंग यांच्या आठवणी आणि कार्याला त्यांनी उजाळा दिला. यावेळी प्रधानमंत्र्यांनी आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या काही खेळाडूंच्या संघर्षगाथा श्रोत्यांना सांगितल्या. यात तिरंदाजी या क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या साताऱ्यातल्या प्रवीण जाधव या खेळाडूचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, समाजमाध्यमांवर चीअर फोर इंडिया (#Cheer४India) हा हॅशटॅग चालवण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं.
येत्या १५ ऑगस्टपासून देशाच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष सुरु होणार आहे, हा अमृत-महोत्सव आपल्या सगळ्यांसाठी मोठी प्रेरणा असेल. येत्या काळात इंडिया फर्स्ट हाच आपला मंत्र असायला हवा, आणि हा मंत्रच आपल्या प्रत्येक निर्णयाचा आधार असायला हवा, असंही ते म्हणाले.
या अमृतमोहत्सवानिमित्त आपल्याला स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित इतिहास पुनरुज्जीवीत करायचा आहे. या कामात अत्यंत कमी काळात हजारो तरुण पुढं आले. त्याचप्रमाणे या अमृत महोत्सवासाठी प्रत्येकानं शक्य ते योगदान द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं.
सध्या देशभरात सुरु असलेल्या काळात हरप्रकारे पावसाचं पाणी साठवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायचं आवाहन त्यांनी देशवासीयांना केलं. यादृष्टीनं देशभरात होत असलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. आपल्याला लाभलेला औषधी वनस्पतींचा शेकडो वर्षांचा वारसा जपण्यासाठी प्रयत्न करायचं आवाहनही त्यांनी केलं.
येत्या १ जुलै रोजी येणाऱ्या सनदी लेखापाल दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी सनदी लेखापाल चांगली आणि सकारात्मक भूमिका बजावू शकतात असं म्हणाले.
मन की बात च्या आजच्या भागावर आधारित प्रश्नमंजुषा नमो अॅपवर आयोजित केली आहे. प्रत्येकानं त्यात भाग घ्यावा, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे.