नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीमुळे बाधित झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अनेक उपाययोजना जाहीर केल्या.
नवी दिल्लीत वार्ताहार परिषदेत त्यांनी या योजनांची घोषणा केली. ६ लाख २८ हजार ९९३ कोटी रुपयांच्या या पॅकेजमध्ये कोविड प्रभावीत क्षेत्रासाठी १ लाख १० हजार कोटी रुपयांची कर्ज हमी योजना घोषित केली आहे. त्यापैकी ५० हजार कोटी रुपये आरोग्य क्षेत्रासाठी असून त्याचा उपयोग आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी केला जाईल, ही योजना देशातली ८ महानगरं वगळून इतर शहरांमधल्या नव्या प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी राबवली जाईल.
आत्मतनिर्भर भारत योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत वाढ दिली असून आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत तातडीच्या पत हमी योजनेसाठी दीड लाख कोटी रुपयांची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.या योजनेअंतर्गत आतापर्यंत १२ सार्वजनिक, २५ खाजगी बँका तसेच इतर वित्तीय कंपन्यांच्या माध्यमातून १ कोटी १० लाख छोट्या उद्योगांना २ लाख ६९ हजार कोटी रुपये वितरीत केले आहेत.
व्यवसाय करणाऱ्यांसाठी या योजनेची हमी मर्यादा तीन लाख कोटीवरुन साडेचार लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. या व्यतिरिक्त २५ लाख छोट्या व्यवसायिकांसाठी सूक्ष्म वित्त संस्थांच्या माध्य़मातून कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी नवी कर्ज हमी योजना घोषित केली आहे. त्याअंतर्गत सव्वा लाख रुपयांपर्यंत कर्ज देता येईल.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला ही मुदत वाढ दिली असून या अंतर्गत ५ किलो धान्य विनामूल्य दिल जात. याअंतर्गत या वर्षी ९३ हजार ८६९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठीही वित्तसहाय्य योजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातल्या व्यवसायिकांना प्रत्येकी १० लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत १०० टक्के पत हमी तर परवानाधारक गाईडसाठी १ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे.