मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीला या महिनाअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, असं सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं. राज्यात एप्रिल आणि मे २०२१ मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यात आलेल्या अडचणी आणि साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप देय असलेली एफआरपी विचारात घेता, ही मुदतवाढ दिली असल्याचं पाटील म्हणाले. वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र असतील. याबाबतचा शासननिर्णय काल जारी केला आहे.