Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशातलं पहिलं कृषी निर्यात सुविधा केंद्र पुण्यात सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्तानं, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर, म्हणजेच एमसीसीआयए या संस्थेनं नाबार्डच्या सहकार्यानं स्थापन केलेल्या देशातल्या पहिल्या कृषी निर्यात सुविधा केंद्राचं पुण्यात नुकतंच उद्घाटन झालं.

कोरोना नियमावलीचं पालन करत नाबार्डच्या पुणे विभागाचे मुख्य सरव्यवस्थापक जी. एस. रावत यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. यावेळी ‘एमसीसीआयए’च्या कृषी समितीचे अध्यक्ष उमेशचंद्र सरंगी आणि ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते.

या केंद्राचं १५ मे रोजी दूर दृश्य प्रणालीच्या स्वरुपात उद्घाटन झालं होतं. आता महाराष्ट्रातल्या कृषी-अन्न उत्पादन क्षेत्रातल्या संभाव्य निर्यातदारांसाठी प्रत्यक्ष सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

या केंद्राच्या माध्यमातून निर्यातदारांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारचं सहकार्य मिळेल, असं मराठा चेंबरनं काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. आवश्यक आणि योग्य ती माहिती पुरवून, योग्य वेळी मार्गदर्शन करून आणि प्रशिक्षण शिबिरे राबवून राज्यातून कृषी आणि अन्न उत्पादनांच्या निर्यातीत वाढ करणं, हा हे सुविधा केंद्र स्थापन करण्यामागचा उद्देश आहे.

निर्यात प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांच्या, शेतकरी उत्पादक संघटनांच्या, कृषी अन्न प्रक्रिया उद्योगातल्या कंपन्यांच्या आणि नव्या-जुन्या निर्यातदारांना या केंद्राच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे, असंही या पत्रकात म्हटलं आहे.

Exit mobile version