राज्यपालांच्या हस्ते दृष्टिहीन मुलांना ‘डिजिटल स्मार्ट स्टीक्स’ प्रदान
Ekach Dheya
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते १५ दृष्टिहीन मुलांना विनाअडथळा चालण्यासाठी डिजिटल स्मार्ट स्टिक्स (डिजिटल सफेद काठी) प्रदान करण्यात आल्या. राजभवन येथे शनिवारी (दि. ३) झालेल्या एका कार्यक्रमात वैष्णव संप्रदायाचे आचार्य गोस्वामी व्रज्रकुमारजी महाराज यांच्या उपस्थितीत मुलांना सेन्सर असलेल्या स्मार्ट स्टीक्स देण्यात आल्या. वल्लभ युथ ऑर्गनायझेशन, विश्व सिंधी सेवा संघम, लायन्स क्लब इंटरनॅशनल व नयन फाउंडेशन फॉर पर्फोर्मिंग आर्टस् यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गरजू व्यक्तींना मदत करण्याची प्रवृत्ती समाजात सर्वांमध्ये असते. मात्र ही प्रवृत्ती जागविण्यासाठी समाजाला साधू संतांची गरज असते असे सांगून देशातील दृष्टिहीन लोकांना स्मार्ट स्टिक देण्याचा संकल्प सोडणारे युवा संत व्रज्रकुमार महाराज हे महान कार्य करीत असल्याचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.
देशात ३० लाख तर एकट्या मुंबईत दीड लाख दृष्टिहीन प्रज्ञाचक्षु लोक आहेत. यापैकी देशातील १ लाख दृष्टिहीन व्यक्तींना व मुंबईतील दहा हजार लोकांना डिजिटल स्मार्ट स्टीक्स देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा वल्लभ युथ ऑर्गनायझेशनचा प्रयत्न असल्याचे व्रज्रकुमार महाराज यांनी सांगितले.
यावेळी वर्ल्ड सिंधी सेवा संघमचे डॉ.राजू मनवाणी, परेश संघवी, गोपालदास, लायन्स क्लबचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर्स तसेच नयन फाउंडेशनच्या संस्थापिका नैना कुत्तप्पन उपस्थित होते.