नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ आणि घाऊक व्यापाराचा सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगक्षेत्रात समावेश करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. हा ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे देशभरातल्या कोट्यवधी व्यापाऱ्यांना अर्थसहाय्य उभं करायला, तसंच इतर लाभ मिळवत आपला व्यापार वाढवायला मदत होईल, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. देशभरातल्या व्यापाऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.
सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी काल या क्षेत्रांसंबंधीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. किरकोळ आणि घाऊक व्यापाराचा या क्षेत्रात समावेश करायचं या सूचनांमध्ये नमूद केलं केलं होतं. या नव्या मार्गदर्शक सूचनांचा देशभरातल्या सुमारे अडीच कोटी किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना फायदा होईल असं गडकरी यांनी म्हटलं आहे.