Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशाच्या समृद्ध परंपरा आणि गौरवशाली इतिहासाची मुलांना माहिती देण्याचे उपराष्ट्रपतींचे शिक्षकांना आवाहन

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांना एकात्मिक आणि सर्वंकष शिक्षण देण्याचे आवाहन उपराष्ट्रपी एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.

शिक्षक हे राष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार आहेत अशा शब्दात गौरव करत शिक्षकांनी, विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यं, समानता, स्वातंत्र्य, न्याय, धर्मनिरपेक्षता, सहानुभूती, मानवी मूल्यांचा आदर ही मूल्यं बाणावीत असे आवाहन त्यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त दिल्ली तमिळ शिक्षण संघटना शाळेतल्या शिक्षकांशी उपराष्ट्रपतींनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. शाळेतले वर्ग म्हणजे आनंददायी शिक्षण देणारी केंद्र बनवावीत यासाठी शिक्षकांनी पुन्हा कटिबद्ध व्हावे असे ते म्हणाले.

मुलांना आपली समृद्ध परंपरा, वारसा आणि गौरवशाली इतिहास ज्ञात करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. मुलांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी, स्वातंत्र्यसैनिक, थोर शास्त्रज्ञ, कलाकार यांची माहिती देणाऱ्या धड्यांचा पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा असेही ते म्हणाले.

शाश्वत विकास, निसर्गाशी साहचर्य राखणारी जीवन पद्धती यासारख्या संकल्पनांचा समावेश तसेच स्वच्छ भारत यासारख्या कार्यक्रमाचीही मुलांना माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

मुलांनी घरी, आपापल्या मातृभाषेत बोलावं यासाठी शिक्षक आणि पालकांनी प्रोत्साहन द्यावं असेही त्यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षण स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना मातृभाषेत सूचना द्याव्यात असे मत त्यांनी व्यक्त केले.

Exit mobile version