नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनास्थिताच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारनं तात्काळ प्रतिसाद आणि आरोग्य व्यवस्था तयारीच्या दुसऱ्या ट्प्प्याची योजना जाहीर केली असून त्यासाठी २३ हजार १२३ कोटी रुपयांचा निधी चालू आर्थिक वर्षासाठी केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूर केला आहे.
काल संध्याकाळी नवी दिल्ली मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. कोविडला तातडीनं आळा घालणं, शोध घेण आणि व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं तात्काळ प्रतिसादासाठी आरोग्य व्यवस्थेच्या तयारीला गती देणं, आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधांवर भर देणं हा योजनेचा उद्देश आहे.
हा दुसरा टप्पा १ जुलै ते ३१ मार्चपर्यंत केंद्र आणि राज्यांच्या सहभागातून राबवला जाणार आहे, त्या केंद्राचा वाटा १५ हजार कोटी रुपये तर, राज्यांच्या वाटा ८ हजार १२४ कोटी रुपये असेल, असं त्यांनी सांगितलं.
या नव्या योजनेअंतर्गत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश ७३६ जिल्ह्यांमधे बालरुग्ण केंद्र निर्माण करण्यासाठी मदत करतील. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत २० हजार आयसीयू खाटा ते उभारतील, त्यापैकी २० टक्के खाटा बालरुग्णांसाठी राखीव असतील.
पदवी शिक्षण घेणारे आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे वैद्यकीय तसंच परिचर्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना प्रभावी कोविड व्यवस्थापनासाठी सहभागी करुन घेतलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
प्रत्येक जिल्ह्यात किमान एक याप्रमाणे १ हजार ५० द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू साठवणूक टाक्या उभारण्यासाठीही या पॅकेजची मदत होईल, असं त्यांनी सांगितलं.