Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सर्वांना सुखी समाधानी ठेवून ऐश्वर्य लाभू देवो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाकडे केली प्रार्थना

पुणे : सर्वांना जीवनात सुखी समाधानी ठेवून ऐश्वर्य लाभू देवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाकडे केली. सध्या सर्वत्र गणेशपर्व सुरू असून पुण्यातील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, गणेशोत्सवाच्या निमिताने श्री गणेशाचे दर्शन घेण्याकरीता आणि त्यासोबत लोकमान्यांना वंदन करण्यासाठी  मला येथे येण्याची संधी मिळाली, याचा मला खरोखर आनंद आहे. गणेशोत्सवाची ही परंपरा लोकमान्य टिळकांनी उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला करून दिली. परिणामी  त्यातूनच या उत्सवाला सामाजिक अभिसरणाचे स्वरुप प्राप्त झाले. तेच स्वरुप पुण्यामध्ये अनेक मंडळानी जतन केले आहे. सर्वांना गणोशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन ते म्हणाले, श्री गणेशाला प्रार्थना करतो की, आपल्या सर्वांना सुखी समाधानी ठेवून ऐश्वर्य लाभू देवो व श्री गणेशाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र देखील प्रगतीपथावर जात राहो, अशी प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले .

यावेळी महापौर मुक्ता टिळक, खा. गिरीश बापट, खा.संजय काकडे, आ. दिलीप कांबळे, आ.भीमराव तापकीर, आ. माधुरी मिसाळ, पुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे आदी उपस्थित होते.

विविध मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम मानाचा पहिला कसबा गणपती यांचे दर्शन घेवून आरती केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी मुख्यमंत्री यांचे स्वागत केले. त्यानंतर दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीला भेट देवून दर्शन घेतले व आरती केली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे व उत्सव प्रमुख हेमंत रासने यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी दि विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस 5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

यानंतर मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले.  यावेळी अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी मंडळाच्या व  सिध्देश्वर ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी रुपये 51 हजाराचा धनादेश देण्यात आला. यानंतर मानाचा चौथा गणपती  तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी  महापौर मुक्ता टिळक व दैनिक केसरीचे संपादक दिपक टिळक यांनी  त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीस दि जनता सहकारी बँक यांच्याकडून रुपये 21 लाख व उद्यम विकास बँक व चरणजीत सहाणी यांनीही मुख्यमंत्री सहायता निधीस धनादेश दिला.

यानंतर साने गुरुजी तरुण मंडळ येथील गणपतीचे दर्शन घेवून मंडळामार्फत उभारण्यात आलेल्या देखाव्याचे उद्घाटन केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष धिरज घाटे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर मुख्यमंत्री यांनी कोथरुड येथील श्री साई मित्र मंडळ यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन केले. तसेच गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले.

Exit mobile version