Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कुठल्याही किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारची परवानगी देणार नाही.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज आणि जो मराठयांचा इतिहास आहे, त्यांच्याशी सबंधित कुठल्याही किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारची परवानगी देणार नाही, अशा किल्ल्यांना आम्ही नखभरही हात लावू देणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.

मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री पुणे येथे आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले, किल्लांसंदर्भात पसरविण्यात आलेली बातमी अत्यंत चुकीची आहे. यासंदर्भात पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी पत्रकार परिषद घेवून स्पष्टीकरण दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठयांचा जो इतिहास आहे त्यांच्याशी सबंधित कुठल्याही किल्ल्यांवर कुठल्याही गोष्टीची कधीच परवानगी देण्याचा प्रश्नच नाही. हे सर्व संरक्षित किल्ले आहेत.

सरकारने स्वराज्याची राजधानी रायगडचा विकास केला, त्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी लक्ष घालून ज्याप्रकारे काम रायगड किल्ल्यावर चालू केले आहे. तसाच इतिहास आम्हाला जतन करावयाचा आहे. ऐतिहासिक किल्ल्यांच्या व्यतिरिक्त जे दोन-तिनशे किल्ले आहेत, तिथे पर्यटनाच्या दृष्टीने काही करता येईल का, यासंदर्भातील तो निर्णय होता. कुठले समारंभ, लग्न याला काही अर्थ नाही. छत्रपतींचा आणि हिंदवी स्वराज्याचा, मराठयांच्या साम्राज्याचा इतिहास ज्या किल्ल्यांशी सबंधित आहे, अशा किल्ल्यांना आम्ही नखभरही हात लावू देणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले.

Exit mobile version