कृत्रिम सांधेरोपण शिबीराचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन कोरोना काळातील स्टर्लिंग हॉस्पिटलचे काम उल्लेखनीय : आरोग्यमंत्री राजेश टोपे
Ekach Dheya
पुणे : कोरोना काळात स्टर्लिंग हॉस्पिटलने उल्लेखनीय काम केले आहे. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने रुग्णालयाने आयोजित केलेले मोफत महाशिबीर हे आजच्या काळ आणि वेळेनुसार गरजेचे आहे. हा स्तुत्य उपक्रम असून गरजूंना याचा निश्चितच लाभ होईल, असे गौरवोद्वार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काढले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आयुर्वेद रुग्णालय व स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त निगडी येथे आयोजित मोफत कृत्रिम सांधेरोपण व दुर्बीणीद्वारे स्नायु दुरुस्ती शत्रक्रिया महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार आण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ उपस्थित होते.
आरोग्यमंत्री श्री टोपे यांनी यावेळी 1941 साली स्थापन झालेल्या शिक्षण मंडळाच्या कार्याचा गौरव केला. ते पुढे म्हणाले संस्थेचा गुणात्मक शिक्षण देण्यावर भर आहे. संस्थेमध्ये सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध असून संस्थेचे काम अत्यंत पारदर्शक पध्दतीने सुरू आहे. सामान्य माणसासाठी काम करा हा राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा वारसा अजित पवार पुढे चालवत आहेत, असे गौरवोद्गार श्री टोपे यांनी काढले, तसेच शिक्षण मंडळाच्या कार्याचे कौतुक करून संस्थेने अशीच प्रगती करावी अशा शुभेच्छा दिल्या.
श्री टोपे पुढे म्हणाले, तज्ञ मनुष्यबळ हा आरोग्य विभागाचा कणा आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत प्रक्रिया सुरु केली असून लवकरच रिक्त पदे भरण्यात येतील. आरोग्य विभागाने कोरोना काळात सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे. सामान्य माणसाला परवडणाऱ्या दरात सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या. लसीकरणावर भर दिला. अद्यापही ग्रामीण भागात लसीकरणाबाबत गैरसमज आहेत त्यामुळे लसीकरणाबाबत प्रचार करावा लागेल, असेही ते पुढे म्हणाले.
सुरवातीस श्री. टोपे यांच्या हस्ते धन्वतंरीचे पूजन करण्यात आले. रुग्णालयाच्या प्राचार्य रागिनी पाटील यांनी प्रास्ताविक केले. महाशिबीरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती तसेच रुग्णालयाची माहिती त्यांनी यावेळी दिली. कोरोना संकटाशी लढा देत असणा-या कोरोना योध्दयांचा सत्कार आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या हस्ते करण्यात आला.