टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात मीराबाई चानूने पटकावले रौप्य पदक
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावून भारताच्या ऑलिम्पिक पदक तालिकेत मोठं यश प्राप्त केलं आहे. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील हे भारताचे पहिलेच पदक आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानू यांचे अभिनंदन केले आहे. हॉकीमध्ये भारतीय संघानं अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंड संघाचा ३-२ असा पराभव केला. भारतीय महिला हॉकी संघाचा आज पहिला सामना होणार आहे. तिरंदाजीमध्ये मिश्र सामन्यात उपान्त्यपूर्व फेरीत दीपिकाकुमारी आणि प्रवीण जाधव यांच्या संघाचा दक्षिण कोरियाकडून २-६ असा पराभव झाला.टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या शरथ कमल आणि मनिका बत्रा यांचा चीनच्या खेळाडूकडून पराभव झाला.नेमबाजीमध्ये सौरभ चौधरी १० मीटर एयर पिस्टल प्रकारात सातव्या स्थानावर राहीला. तर दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत मात्र भारतीय महिला नेमबाजांचे आव्हान संपुष्टात आलं आहे.