Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशच आपली कायमची सर्वात मोठी ‘आस्था’ आणि सर्वात मोठी ‘प्राथमिकता’ – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त Nation First, Always First”, हा मंत्र घेऊनच पुढे वाटचाल करायचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. देशच आपली कायमची सर्वात मोठी ‘आस्था’ आणि सर्वात मोठी प्राथमिकता असेल असा अमृत संकल्प करायचं आवाहनही त्यांनी या संवादातून केलं.देशाला स्वातंत्र्य मिळायला अनेक शतकं लागली, मात्र त्याच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या क्षणांचे साक्षीदार व्हायला मिळणं हे आपलं भाग्य आहे.

यानिमीत्तानं होत असलेल्या विविध कार्यक्रमांप्रमाणेच सांस्कृतिक मंत्रालयानं जास्तीत जास्त भारतीयांनी एकाच वेळी राष्ट्रगीत गाता यावं यासाठी राष्ट्रगान डॉट इन या संकेतस्थळाच्या माध्यमातून अभिनव प्रयत्न केला आहे. त्यावर आपण सगळ्यांनी राष्ट्रगीत ध्वनिमुद्रित करून सहभाग नोंदवायचं आवाहन त्यांनी केलं.कारगिलचं युद्ध म्हणजे भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचं प्रतिक आहे.त्याचं स्मरण करण्यासाठी अमृत महोत्सवाच्या दरम्यानच उद्या देशभर साजरा होत असलेला कारगिल विजय दिवस’अधिकच विशेष आहे.

सर्व नागरिकांनी कारगील युद्धाची रोमांचकारी कथा नक्की वाचाव्या आणि कारगीलच्या योद्ध्यांना वंदन करावं असं ते म्हणाले.विविधतेनंच भारताला एकसंध ठेवेल, अशा रितीनं आपण आपलं काम करायला हवं.व्होकल फॉर लोकलचा अंगिकार करून आपल्या देशातल्या स्थानिक उद्योजक, कलाकार, शिल्पकार, विणकर यांना आधार देणं, हे आपल्या रोजच्या सवयीचा भाग बनायला हवेत असं ते म्हणाले.

आपल्या दैनंदिन कामांमधूनही आपण राष्ट्र निर्मितीचं काम करु शकतो असा सल्ला त्यांनी देशवासीयांना दिला.देशाच्या ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या नागरिकांचं हातमाग हे उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन आहे. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जबाबदारीच्या भावनेतून आपण ग्रामीण भागात तयार होणाऱ्या हातमागाच्या खरेदी कराव्यात, खादीची खरेदी म्हणजेच एकप्रकारची लोकसेवा आणि देशसेवा असल्याचं ते म्हणाले.यावेळी प्रधानमंत्र्यांनी देशभरात बांधकाम व्यवसाय क्षेत्र आणि कृषी क्षेत्रात होत असलेल्या विविध अभिनव प्रयत्नांबद्दलची माहिती दिली.

देशातल्या युवकांना राष्ट्रहितासाठी तंत्रज्ञानाच्या नवनव्या क्षेत्रांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, यासाठी आपण मन की बात मधून अशा प्रकारचे प्रयत्न पोचवायचा आपला प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.इतर देशांसोबतचे भारताशी असलेले संबंध अधिक बळकट होण्याच्यादृष्टीनं परस्परांची संस्कृती समजून घेणं महत्वाचं असल्याचं सांगून, या संदर्भानं अलिकडेच जॉर्जिया आणि सिंगापूरसोबतच्या घडामोडींची माहीती त्यांनी दिली.

मन की बातमधून आज पुन्हा एकदा जलसंधारणाचं महत्व अधोरेखीत करत, हा विषय आपल्या जिव्हाळ्याचा असल्याबाबतचे स्वानुभव प्रधानममंत्र्यांनी सांगितले.पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणं आणि कुठल्याही प्रकारे पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेणं हा आपल्या जीवनशैलीचाच भाग व्हायला हवा असं आवाहन त्यांनी केलं. सर्व नागरिकांना आगामी सण -उत्सवांच्या शुभेच्छा देत कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत राहायचं आवाहन त्यांनी केलं.

Exit mobile version