Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्हास्तरावर यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्हास्तरावर याबाबत यंत्रणा उभारली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज चिपळूण इथं पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते.

राज्यातल्या पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसान भरपाईबाबत निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही. प्रश्न केवळ आर्थिक मदत पुरवण्याचा नसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभा करणं याला प्राथमिकता असेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी करणार आहे.त्यानंतर दोन-तीन दिवसात आर्थिक नुकसानीचा आढावा घेतला जाईल. दरम्यानच्या काळात तातडीची मदत म्हणून अन्न तसंच औषधं, कपडेलत्ते, इतर अत्यावश्यक बाबी पुरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मदत पुरवताना कोणत्याही तांत्रिक मुद्यांवर अडचणी येऊ नये यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत असं त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून आपल्याला व्यवस्थित मदत मिळत आहे. माझे प्रधानमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांशी आपलं बोलणं झालं आहे. एनडीआरएफ, लष्कर तसंच हवाई दल यांच्या तुकड्या राज्य सरकारला पूर परिस्थितीत मदत करत आहेत, पूर्ण आढावा घेतल्यानंतरच आर्थिक मदतीबाबत केंद्राकडून मागणी केली जाईल असं ते म्हणाले.

Exit mobile version