नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेगासिस हेरगिरी आणि इतर मुद्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला आणि कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब करावं लागलं. राज्य सभेत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर सदस्यांनी हौद्यात जमून स्थगन प्रस्ताव मांडला. गदारोळ सुरुच राहिल्यामुळे आधी १२ पर्यंत आणि नंतर दुपारी २ पर्यंत कामकाज तहकूब करावे लागले.
लोकसभेत साडे बारानंतर कामकाज सुरु होऊनही गदरोळ कायम राहिला, त्यामुळे कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब करावं लागलं. तत्पूर्वी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हौद्यात जमा होऊन घोषणाबाजी केली. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खेद व्यक्त करुनही गदारोळ सुरुच राहिला. त्यामुळे कामकाज तहकूब करावं लागलं.
पन्नासहून अधिक स्टार्ट अप्समधून यंदाच्या १४ जुलैपर्यत ५ लाख ७ हजाराहून अधिक रोजगार तयार झाल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग राज्य मंत्री सोम प्रकाश यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली. हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून देशात रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी तो महत्त्वाचा असल्याचं ते म्हणाले.