देशात उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य नियोजित वेळेआधी पूर्ण – पंतप्रधान
औरंगाबाद : शहर नवी स्मार्ट सिटी म्हणून पुढे येत आहेच, त्याचबरोबर हे शहर देशाच्या औद्योगिक घडामोडींचे केंद्रही ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज औरंगाबाद इथे महिला बचत गटांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. औरंगाबादमध्ये मोठ्या औद्योगिक कंपन्यांनी काम सुरु केले आहे. आणखीही कंपन्या इथे येऊन लाखो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असेही पंतप्रधान म्हणाले.
महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या उज्ज्वला योजने अंतर्गत 8 कोटी’व्या लाभार्थीला एलपीजी कनेक्शन पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आले. 8 कोटी मोफत गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट वेळे आधीच पूर्ण झाले. या 8 कोटीं पैकी 44 लाख कनेक्शन महाराष्ट्रात देण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. देशात एलपीजी कनेक्शनविना एकही कुटुंब राहता कामा नये, यासाठी सरकार काम करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
महिला आर्थिक सशक्तीकरणाबरोबरीने सामाजिक परिवर्तनाचाही महत्वाचा भाग आहेत, असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.
महिलांना उद्योजक बनवण्यामध्ये मुद्रा योजनेची महत्वाची भूमिका राहिली आहे. या योजने अंतर्गत 20 कोटी लाभार्थींना कर्जे देण्यात आली असून, त्यापैकी 14 कोटी महिला आहेत. महाराष्ट्रात दीड कोटी लाभार्थींना कर्जे देण्यात आली असून, त्यात सव्वा कोटी महिलांचा समावेश असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
महिला बचत गटांसाठीच्या व्याजासाठीचे अनुदान संपूर्ण देशात लागू होत आहे.
प्रत्येक कुटुंबाला 2022 पर्यंत घर देण्यासाठी आपल्या सरकारने सर्वंकष दृष्टीकोन स्वीकारला असून, केवळ चार भिंती नव्हे, तर सर्व सुविधांनी युक्त घर पुरविण्यासाठी विविध सरकारी योजना एकत्र जोडल्या आहेत. स्थानिक लोकांच्या इच्छा आणि गरजा लक्षात घेऊनच या घरांची निर्मिती करण्यात येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या सरकारने पारदर्शकतेवर भर दिला असून, घर विकत घेणाऱ्यांना ‘रेरा’ कायद्यामुळे आधार मिळाला आहे.
नव भारतात महिला कल्याणच नव्हे तर महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मराठवाड्यातले पहिले वॉटर ग्रिड प्रशंसनीय आहे. हे वॉटर ग्रिड तयार झाल्यानंतर या क्षेत्रात पाण्याची उपलब्धता वाढेल आणि प्रत्येक गावापर्यंत तसेच सिंचनासाठी शेतापर्यंत पाणी पोहोचवायला यामुळे मदत होईल. शेतकऱ्यांना सिंचनाला पाणी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांना पाण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या कष्टाची आपल्याला जाणीव आहे, यातून त्यांना मुक्त करण्यासाठी जलजीवन मिशनची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानासाठी 3.5 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
मुलींप्रती समाजाच्या विचारात व्यापक परिवर्तनाची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.
देश हागणदारीमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्राच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. यादृष्टीने कोकणातले समुद्रात जाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात वळवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात बचत गटाची चळवळ उभी केली गेली. 5 वर्षात 50 लाख कुटुंब बचतगटाशी जोडली गेली. इंडस्ट्रीयल पार्कमध्ये महिला बचत गटांसाठी 30 टक्के जागा राखीव ठेवणार असल्याचे ते म्हणाले. महिला बचत गटांना दिलेला पैसा 100 टक्के परत आलेला आहे. हे लक्षात घेऊनच त्यांना व्याजमुक्त कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ऑरिक अर्थात औरंगाबाद औद्योगिक शहर परियोजनेचे, इमारतीचे तसेच नियंत्रण कक्षाचे लोकार्पण पंतप्रधानांनी केले. ग्रामीण महाराष्ट्रामधले परिवर्तन यासंदर्भातल्या एका पुस्तकाचे प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.