Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात २२ जिल्ह्यांमधे कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या २२ जिल्ह्यांमधे कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल केले आहेत. कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, आणि पालघर या ११ जिल्ह्यांमध्ये ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या स्तराचे निर्बंध कायम ठेवले आहेत.

तर, मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांबाबतचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर सोपवला आहे. हे १४ जिल्हे सोडून राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. त्यानुसार आजपासून  या जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारची दुकानं आणि मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत, तर शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु राहतील.

रविवारी जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता इतर सर्व दुकानं आणि मॉल्स बंद राहतील. सर्व सार्वजनिक उद्यानं, मैदानं व्यायाम, चालणं, धावणं, सायकलिंग इत्यादीसाठी खुली केली आहेत. सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं  सुरु राहतील.

प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याची सूचना शासनानं केली आहे. जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीनं सुरु ठेवता येऊ शकतात ती तशी सुरु ठेवण्याची सूचना दिली आहे.

सर्व प्रकारची शेतीविषयक कामं, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग पूर्ण क्षमतेनं सुरु राहतील. जिम, व्यायामशाळा, योग केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालयं सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येतील.

शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील. एसी, अर्थात वातानुकूलन यंत्रांचा वापर करता येणार नाही. चित्रपटगृहं, नाट्यगृहं, तसेच मॉल्समधले मल्टीप्लेक्स बंद राहतील. यात कोणतीही सूट नाही. सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळं बंदच राहतील.

शाळा, महाविद्यालयांच्याबाबतीत शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण विभाग निर्णय घेतील. सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र आरोग्याच्या कोविडविषयक नियमांचं पालन करावं लागेल. टेक अवे किंवा पार्सल सेवा सध्याप्रमाणे सुरु ठेवता येईल.

रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही. वाढदिवस समारंभ, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार, मिरवणुका, निदर्शन मोर्चे यांच्यावरचे निर्बंध कायम ठेवले आहेत.

निर्बंध शिथिल केले असले तरी नागरिकांनी आरोग्याचे नियम पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरत राहावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Exit mobile version