Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपयांच्या निधीला केंद्रसरकारची मंजूरी

मुंबई (वृत्तसंस्था) : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे, वाहून गेलेल्या किंवा खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम ताबडतोब सुरु करण्यात आलं आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या कामासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी आज ट्विटर संदेशात दिली आहे. यात ५२ कोटी रुपये तात्पुरत्या डागडुजीसाठी आणि ४८ कोटी रुपये कायमच्या दुरुस्त्या आणि बांधणीसाठी मंजूर करण्यात आले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण जवळचा वशिष्ठी नदीवरचा पूल देखील पावसामुळे खराव झाला होता, त्याची दुरुस्ती लगेच करुन ७२ तासात तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असंही गडकरी यांनी सांगितलं. तसंच, परशुराम घाट, कारूळ घाट, आंबा घाट, इथं रस्त्यात आलेले अडथळे देखील दूर करण्यात आले आहेत. तात्पुरत्या दुरुस्तीची कामं आधीच हातात घेण्यात आली असून, कायमची दुरुस्ती करण्याचंही काम प्राधान्यानं केलं जाईल, असंही गडकरी यांनी सांगितलं.

Exit mobile version