सांगली : हवामान खाते मुंबई यांच्याकडील अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात तीन दिवसाकरिता अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाला असून सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे प्रमुख धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. विसर्गामुळे आयर्विन पुल सांगली येथील पाणी पातळीमध्ये वाढ होऊन सध्या ती 30.2 फूट झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची दोन पथके दाखल झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
103.51 टीएमसी पाणीसाठा असणाऱ्या कोयना धरणातून 69 हजार 739 क्युसेस, धोम धरणातून 6 हजार 995 क्युसेस, कन्हेर धरणातून 5180 क्युसेस, उरमोडी धरणातून 4 हजार 286 क्युसेस, तारळी धरणातून 1601 क्युसेस आणि वारणा धरणातून 11 हजार 894 क्युसेस विसर्ग सुरू आहे. सध्याचे पर्जन्यमान व कोयना व इतर धरणातून वाढलेला विसर्ग यांचा विचार करता ती 34 ते 35 फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या विशेषतः वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील नदीकाठावरील व सखल भागातील लोकांनी सावधानता बाळगावी व नदीपात्रामध्ये कोणीही जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे खबरदारीची उपाययोजना म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची दोन पथके दाखल झाली असून एक पथक इस्लामपूर येथे व एक पथक मिरज येथे तयारीत ठेवण्यात आलेले आहे. सध्या प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारी म्हणून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष क्रमांक 1077 व 0233-2600500 / 9370333932 / 8208689681, पाटबंधारे नियंत्रण कक्ष 0233-2301820 / 2302925 यावरती संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.