कोरोनामुळे ठप्प झालेल्या मनोरंजन विश्वातल्या कलावंतांचे राज्यव्यापी आंदोलन
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावानं गेले दीड वर्षे मनोरंजन विश्व ठप्प आहे. काल क्रांतीदिनाचं औचित्य साधून रंगकर्मींच्या मानसिक आणि आर्थिक वेदनेचा आक्रोश शासनाला कळावा, यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दादरच्या हिंदमाता येथील दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाशेजारी रंगकर्मींनी आंदोलन केलं. यावेळी अनेक रंगकर्मींनी ‘जागर रंगकर्मींचा’ या कार्यक्रमाद्वारे विविध कला सादर करून आपल्या मागण्या मांडल्या. आंदोलन करणाऱ्या विजय पाटकर, विजय राणे, मेघा घाडगे, संचित यादव, शितल माने या रंगकर्मींना भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नाही आणि मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत भोईवाडा पोलिस ठाण्याबाहेरच ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा पवित्रा रंगकर्मींनी घेतला आहे. चित्रपट, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकार तंत्रज्ञ, वाद्यवृंद क्षेत्रातील कलाकार या आंदोलनात सहभागी झाले होते.