एकाच दिवसात ८८ लाखांहून अधिक नागरिकांच्या लसीकरणाचा देशात विक्रम
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाच्या राष्ट्रव्यापी मोहिमेअंतर्गत एका दिवसात सर्वाधिक मात्रा देण्याचा विक्रम काल नोंदण्यात आला. गेल्या २४ तासात ८८ लाख १३ हजारपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलंय. लशीची उपलब्धता वाढल्याने मोहिमेला वेग आला असून सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्रसरकार लशीचा मोफत पुरवठा करीत आहे. आतापर्यंत ५६ कोटी ८१ लाखाहून जास्त मात्रा राज्यांना देण्यात आल्या असून आणखी १ कोटी ९ लाख ३२ हजार मात्रा लवकरच देण्यात येतील. काल दिवसभरात कोविडचे २५ हजार १६६ नवे रुग्ण आढळले असून गेल्या १५४ दिवसातली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. सध्या देशात सक्रीय रुग्ण ३ लाख ६९ हजार ८४६ असून हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या एक पूर्णांक १५ शतांश टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ५१ शतांश टक्के झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी १४ लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यातले ३६ हजाराहून जास्त रुग्ण काल दिवसभरात बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर मार्च २०२० च्या तुलनेत सर्वाधिक असून एकूण रुग्णसंख्येत सक्रीय रुग्णांचं प्रमाण सर्वात कमी आहे. कोरोना चाचण्यांचा वेगही वाढवण्यात आला असून आतापर्यंत एकोणपन्नास कोटी ६६ लाख नमुने तपासण्यात आले.