मोहरमनिमित्त ताजिया करता मुंबई उच्च न्यायालयाकडून सशर्त परवानगी
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मोहरमनिमित्त येत्या शुक्रवारी ताजिया करता मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. ही परवानगी केवळ मुंबईत लागू असून राज्यात इतरत्र नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. मोहरमनिमित्त इमाम हुसैन यांचा ताबूत मिरवणुकीने घेऊन जाणे आणि वाटेत खानपानाची व्यवस्था करणे ही शिया मुसलमान समाजाची धार्मिक परंपरा असल्याने त्याला कोविड काळातही परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका ऑल इंडीया इदारा ताहफज़ ए हुसैनियत या संघटनेने दाखल केली होती त्यावर न्यायमूर्ती कमलकिशोर तातेड आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठाने हा निर्णय दिला. शहरात केवळ ५ ताजिया काढता येतील त्याकरता ३ तासांची कालमर्यादा राहील. कोविड प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या प्रत्येकी १५ व्यक्ती याप्रमाणे ७ ट्रकवर मिळून १०५ जणांना त्यात सहभागी होता येईल. त्यातल्या केवळ २५ जणांनाच दफनभूमीवर प्रवेश मिळेल. मिरवणुकीत कोविड१९ प्रतिबंधासाठी सुसंगत वर्तन म्हणजेच मास्कचा वापर, शारीरिक अंतर राखणे अनिवार्य राहील – अशा अटी न्यायालयाने घातल्या असून त्यांचं काटेकोर पालन होईल याकडे लक्ष पुरवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.