Site icon साप्ताहिक एकच ध्येय

गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यात अनेक भागात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे काही धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. नांदेड जिल्ह्यातलं विष्णुपुरी आणि हिंगोली जिल्ह्यातलं सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणातही ७९ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. मात्र जायकवाडी, मांजरा, निम्न तेरणा, सीना कोळेगाव आणि माजलगाव या धरणांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली नाही. दरम्यान, कालही अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात किनवट, माहूर, भोकर या महसूल मंडळात मुसळधार तर बिलोली, अर्धापूर, मुदखेड, मुखेड या महसुल मंडळात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर उमरी, नायगाव, हिमायतनगर, लोहा, धर्माबाद, कंधार या महसूल मंडळात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. औरंगाबाद शहर आणि परिसरातही काल दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. दौलताबाद परिसरातही दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे घाट परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. नाशिक जिल्ह्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.

Exit mobile version