मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्रातील निवृत्तीवेतनधारकांना आयकर कपात परिगणनेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
Ekach Dheya
मुंबई : मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्रीय हद्दीतील आयकर अधिनियम कलम 115 बीएसी अन्वये आयकर कपातीच्या परिगणनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे 30 सप्टेंबरपर्यंत अधिदान व लेखा कार्यालयास पाठवावीत असे आवाहन सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) यांनी केले आहे.
आयकर अधिनियम कलम 115 बीएसी अन्वये आयकर कपातीच्या परिगणनेसाठी नवीन करपद्धती (New Tax Regime) व जुन्या कर पद्धतीने (Old Tax Regime) करआकारणी असे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत.जे निवृत्तीवेतनधारक यामधील कर निवडीविषयी विहित वेळेत अधिदान व लेखा कार्यालयास कळविणार नाहीत त्यांची जुन्या कर पद्धतीने (Old Tax Regime) आयकर वसुली केली जाईल. टॅक्सधारकांनी निवडलेला Tax Regime पर्याय व त्यासाठी आवश्यक असणारी आयकर वजातीस पात्र बचत तसेच गुंतवणूक प्रमाणपत्रे व पावत्या अधिदान व लेखा कार्यालयास आपले संपूर्ण नाव, पीपीओ नंबर बँक व ब्रँच सहीत apaopensdat.mum-mh@gov.in या ई-मेल आयडीवर 30 सप्टेंबर 2021 पर्यंत पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.वित्तीय वर्ष 2021-22 करीता ज्या निवृत्तीवेतनधारकांची अंदाजित स्थूल वार्षिक निवृत्तीवेतन रक्कम रु. 6,50,000/- पेक्षा जास्त आहे त्यांची आयकर वसुली त्यांच्या मासिक निवृत्तीवेतनातून समप्रमाणात सुरु करण्यात आलेली आहे.
तरी निवृत्तीवेतनधारकांनी आपली माहिती सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा),अधिदान व लेखा कार्यालय, लेखा कोष भवन, ए विंग, पहिला मजला,कौटुंबिक न्यायालय व एमएमआरडीए कार्यालयाजवळ, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई 400051. सादर करण्यात यावीत असे एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस देण्यात आले आहे.