Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या बंद असलेली मंदिरं उघडावीत, या मागणीसाठी भाजपाचं राज्यभर शंखनाद आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या बंद असलेली मंदिरं उघडावीत, या मागणीसाठी भाजपानं राज्यभर शंखनाद आंदोलन सुरू केलं आहे.नाशिकमध्ये भाजपा तीर्थक्षेत्र आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांचे नेतृत्वाखाली आज गोदावरी नदीच्या काठी शंखध्वनी, घंटानाद, आणि  ढोल-ताशांच्या गजरात आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारनं आता मंदिरं उघडली नाहीत तर राज्यभर तांडव होईल, असा इशारा आचार्य भोसले यांनी यावेळी दिला. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल तसंच अन्य संत महंत उपस्थित होते.तुळजापूर इथंही भाजपानं आज आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली शंखनाद आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. गेल्या अनेक महिन्यांपासून तुळजाभवानी देवीचं मंदिर बंद असल्यामुळे मंदिर परिसरातल्या व्यापाऱ्यांचं उत्पन्न बंद आहे. त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून सरकारनं तातडीनं मंदिर उघडण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. मंदिरं उघडली नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राणा जगजितसिंह पाटील यावेळी यांनी यावेळी दिला.ठाण्यातही मंदिरं उघडावीत या मागणीसाठी भाजपानं आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं. आंदोलकांनी घंटाळी मंदिरात आरती केली.नंदुरबार शहरातही भाजपानं शंखनाद आंदोलन केलं. शहरातील मोठा मारुती मंदीराच्या बाहेर उभे राहत भाजपा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.शहादा शहरातल्या सिद्धीविनायक गणेश मंदीरासमोरही भाजपा कार्यकर्त्यांनी अशाच पद्धतीनं आंदोलन केलं. याच आंदोलनाअंतर्गत, नागपूर इथली दीक्षा भूमी उघडण्यासाठीही भाजपानं आज आंदोलन केलं. भाजपाचे प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात माजी आमदार मिलिंद मानेही सहभागी झाले होते.

Exit mobile version