कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात सांगितलेली शिस्त आणि नियमांचं पालन करावंच लागेल – मुख्यमंत्री
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्यांचं पालन करावंच लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज ठाण्यात ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करताना बोलत होते. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर गोकुळअष्टमीचा सण साधेपणानं साजरा करत आरोग्य उत्सव साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं, त्याला प्रतिसाद देत हा ऑक्सीजन प्लांट उभारला आहे. हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. केंद्रानं देखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत, याची मला जाणीव आहे. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. पण कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेलं आंदोलन नाही हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवं, असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.