Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपान इथं सुरु असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत आज भारतानं दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली.पुरुषांच्या भालाफेकीत एफ सिक्स्टी फोर या गटात भारताच्या सुमित अंतिल यानं ६८ पूर्णांक ८५ मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं. यासोबतच सुमित यानं नव्या विश्वविक्रमाचीही नोंद केली. भारताची नेमबाज अवनी लेखरा हिनं महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. याबरोबरच अवनी ही पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. अवनीनं अंतिम फेरीत २४९ पूर्णांक ६ गुण मिळवत पॅरालिम्पिक स्पर्धेतला नवा विक्रमही रचला, तसंच तीनं विश्वविक्रमाचीही बरोबरी केली. पुरुषांच्या थाळीफेकीत योगेश कथुनियानं ४४ पूर्णांक ३८ मीटरपर्यंत थाळी फेकत रौप्य पदक जिंकलं. योगेशची ही या हंगामातली सर्वोत्तम कामगिरी ठरली. पुरुषांच्या भालाफेकीत आणखी एका गटात भारतानं दोन पदकं जिंकली. देवेंद्र झाझरिया यानं ६४ पूर्णांक ३५ मीटर लांब भाला फेकत रौप्यपदक तर सुंदरसिंग गुर्जर यानं ६२ पूर्णांक ५८ मीटर लांब भाला फेकत कांस्यपदक जिंकलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी पदक विजेत्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.

Exit mobile version