Site icon साप्ताहिक एकच ध्येय

चंद्रपूर जिल्ह्यातील आठ माजी मालगुजारी तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी एक कोटी ३० लाखाचा सीएसआर निधी

हर्बल न्युट्रिशन कंपनी आणि चंद्रपूर जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार 

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील आठ माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी हर्बल न्युट्रिशन कंपनी आणि चंद्रपूर जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार हर्बल न्युट्रिशन कंपनीने तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी एक कोटी 30 लाख रुपयांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी उपलब्ध करून दिला आहे.

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी कंपनीचे संचालक हरिश पंत, नेहा सिंग, के.एम. सौम्या आदी मान्यवर उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 1600 माजी मालगुजारी तलाव आहेत. त्यापैकी 1200 माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार करण्यात आला असून यातील काही तलावांचे काम करण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध करून दिला आहे.

आज झालेल्या सामंजस्य करारामुळे साधारणत: 1200 शेतकऱ्यांना लाभ होणार असून यामुळे कृषी विकास आणि मत्स्यव्यवसायाला चालना मिळेल, असा विश्वास वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. हर्बल न्युट्रिशन कंपनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून राष्ट्र उभारणीच्या कामात देत असलेल्या योगदानाबद्दल वित्तमंत्र्यांनी अभिनंदन केले तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील तलावांसाठी निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

हर्बल  न्युट्रीशन  कंपनी ही 96 देशात कृषी, सिंचन, पशुसंवर्धन क्षेत्राच्या विकासासाठी काम करते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कृषी सिंचाई योजनेत व महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण कार्यक्रमात यानिमित्ताने सहभागी होता येत असल्याचा आम्हाला अभिमान आहे, यातून राष्ट्र हिताचे काम होत आहे,  असे या कंपनीचे भारतातील प्रमुख अजय खन्ना यांनी म्हटले आहे.

Exit mobile version