संसर्ग होऊच नये यासाठी पुरेशी दक्षता घ्यावी – माझा डॉक्टर परिषदेत तज्ज्ञांचं मत
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडपासून संरक्षण करण्यासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून त्याच्याबरोबरच कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे, आजार होऊन उपचार करण्यापेक्षा हा संसर्ग होऊच नये यासाठी पुरेशी दक्षता घेण्याची गरज काल ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी अधोरेखित केली.
डेल्टानंतर कोलंबियामध्ये नवा स्ट्रेन आढळून आल्याचं सांगून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याचं आवाहन अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठातील डॉक्टर मेहुल मेहता यांनी केलं.
कोरोनाच्या कोरोनाच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याची गरज कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉक्टर संजय ओक यांनी व्यक्त केली. कोविड हे तीन आठवड्याचं दुखणं आहे, त्यातील दुसऱ्या आठवड्यातील शेवटचे दिवस हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तीन आठवडे काळजीपूर्वक विलगीकरणात अथवा रुग्णालयात राहून काळजी घेण्याची गरज आहे असं डॉक्टर ओक यांनी सांगितलं.
कोविडची लक्षणे आढळली तरी विलगीकरणात राहून संपर्क तोडा, चाचणी करा, ऑक्सिजन दर, नाडीचे ठोके, ताप, आदींच्या नोंदी करा, ज्यांच्या संपर्कात आलात त्यांनाही चाचणी करायला सांगा असं आवाहन डॉक्टर शशांक जोशी यांनी केलं, मास्क हा प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी असून दुहेरी मास्क संरक्षणासाठी भक्कम ढाल असल्याचं ते म्हणाले.
कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करतानाच रोज मास्क बदला आणि ओला झालेला मास्क कधीही लावू नका अशा सूचना डॉक्टर राहुल पंडित यांनी केल्या. कोविडची लक्षणे दिसली की वेळेत चाचण्या करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
ऑक्सिजनचं प्रमाण ९३ पेक्षा कमी झालं असेल तर पोटावर झोपण्याचा सल्ला आम्ही देतो, त्याचे निश्चितच चांगले परिणाम बघायला मिळतात असं डॉक्टर पंडित म्हणाले. कोविड-पश्चात् लक्षणं दीर्घ काळ राहू शकतात.
थकवा, सांधेदुखी, श्वसनास त्रास, ताणतणाव, निद्रानाश, डोकेदुखी, छातीत वेदना आदी त्रास होतात. अशा लक्षणांवर वेळीच उपचार करून घेण्याचा आणि गंभीर स्वरुपाचा तणाव असेल तर मानसोपचार तज्ज्ञांशी बोलण्याचा सल्ला डॉक्टर अजित देसाई यांनी दिला.
बालकांसाठीच्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू यांनी कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत कोणती काळजी घेतली पाहिजे यावर सविस्तर मार्गदर्शन केलं. पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.
मुलांमध्ये संक्रमण झालं तर त्याची तीव्रता सर्वसाधारणपणे सौम्य असते, पण गंभीर लक्षणं आढळल्यास मुलांना रुग्णालयात दाखल करणं आवश्यक आहे, मुलाबरोबर पालकापैकी एकाला या मुलांसाठीच्या कोविड सेंटरमध्ये थांबण्याची व्यवस्था केलेली आहे असं ते म्हणाले.
आईला जर कोविड असेल तर बाळाची आरटीपीसीआर चाचणी करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं.