ई-पीक पाहणी या प्रकल्पामुळे शेतकरी अधिक सक्षम होण्यास मदत होणार – बाळासाहेब थोरात
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : ई-पीक पाहणी हा राज्यासाठी सुरू करण्यात आलेला व्यापक प्रकल्प असून या प्रकल्पामुळं शेतकरी अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचं प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.
महसूल आणि कृषी विभाग यांच्याकडून संयुक्तपणे हा प्रकल्प राबवला जात आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावर पीक पाहणीची अचूक नोंद होण्यासाठी राज्य शासनानं ‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ ही मोहीम हाती घेतली आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲप १८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी डाऊनलोड केलं असून या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी देखील नोंदविली आहे.
या प्रकल्पामुळं शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च सहज, पारदर्शक आणि बिनचूक पध्दतीनं नोंदवता येईल असं थोरात यांनी सांगितलं. यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणं सहज शक्य होणार असून ई- पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचं क्षेत्र समजण्यास मदत होणार असल्याचंही थोरात म्हणाले.