मंत्रालयं आणि विभागांनी मिळून संकल्पनेवर आधारित समन्वित प्रकल्प राबविणं ही आता काळाची गरज आहे – जितेंद्र सिंग
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुठल्याही विभागानं स्वतंत्रपणे किंवा एकट्यानं काम करण्याचं युग आता संपत आलं आहे असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी काल सांगितलं. विशिष्ट मंत्रालयानं अथवा विभागानं त्या विभागावर आधारित प्रकल्पांऐवजी एखाद्या विषयाची एकत्रित संकल्पना ठरवून काम करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सागितलं. प्रसार माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भविष्यातील योजनांबद्दल ते बोलत होते. या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून ते विज्ञान मंत्रालयाच्या सर्व विभागांच्या संयुक्त बैठका घेत आहेत. तसंच या महिनाअखेरपर्यंत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची एकत्रित बैठक घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या एकत्रित प्रयत्नांतून स्टार्ट-अप, उद्योग आणि इतर भागधारकांचा समावेश करण्यासाठी हा एकात्मिक दृष्टिकोन आणखी वाढवला जाईल असंही सिंग यांनी यावेळी सांगितलं.