Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर  पुरस्कार जेष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने सन 2019-20 साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड केली. श्री. तावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून या पुरस्काराची घोषणा केली.
7 ऑक्टोबर 1941 रोजी जन्मलेल्या उषा खन्ना या भारतीय चित्रपट सृष्टीतील मोजक्या महिला संगीतकारांपैकी असून, व्यावसायिकदृष्टया यशस्वी संगीतकार म्हणून ओळखल्या जातात. सन 1959 मध्ये प्रदर्शित झालेल्या ” दिल देके देखो” या चित्रपटापासून त्यांनी आपल्या संगीत दिग्दर्शनाच्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांच्या पहिल्याच चित्रपटातील संगीत खूप गाजले. त्यानंतर बिन फेरे हम तेरे, लाल बंगला, सबक, हवस, हम हिंदुस्थानी, आप तो एैसे ना थे, साजन बिना सुहागन, साजन की सहेली, अनोखा बंधन, शबनम, सौतन, आओ प्यार करे, यासारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले व ते खूप गाजले. सन 1960-1980 या तीन दशकांच्या संगीत दिग्दर्शनाच्या यशस्वी कारकीर्दीत त्यांनी अनेक नवीन गायकांना गाण्याची संधी दिली. त्यांनी काही मालिकांसाठीही संगीत दिग्दर्शन केले. त्यांनी संगीत दिलेली व गायलेली भजने लोकप्रिय झाली. 2003 मध्ये प्रदर्शित झालेला दिल परदेसी हो गया हा त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट. अनोख्या ठेक्यासाठी त्यांची गाणी आजही ओळखली जातात. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी उषा खन्ना यांचे पुरस्काराबददल अभिनंदन केले आहे.
गायन व संगीत या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केलेल्या मान्यवरांना सन 1993 पासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. संगीतकार राम-लक्ष्मण, उत्तम सिंग, प्रभाकर जोग, गायिका पुष्पा पागधरे, कृष्णा कल्ले यांसारख्या अनेक मान्यवरांना यापूर्वी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
Exit mobile version