देशाची निर्यात क्षमता ४०० अब्ज अमेरिकी डॉलर पर्यंत नेण्यासाठी सर्व राज्यांनी प्रयत्न करणं आवश्यक – रावसाहेब दानवे
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या आर्थिक वर्षात देशाची निर्यात क्षमता ४०० अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचं लक्ष्यं आपण ठेवलं आहे. या लक्ष्य प्राप्तीसाठी सर्वच राज्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे, असं मत केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं. स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत मुंबई इथं दोन दिवसाचं राज्यस्तरीय वाणिज्य उत्सव परिषदेचं आयोजन केलं आहे. विशेषतः महाराष्ट्रानं विशेष योगदान देण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय निर्यातातील महाराष्ट्राचा सध्याचा वीस टक्क्यांचा वाटा वाढायला हवा, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसंच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन झालं. या परिषदेत राज्यातली निर्यात संधी, पायाभूत सुविधा, बॅंकींग आणि वित्तीय सहकार्य या शिवाय खाद्य, कापड, इंजिनिअरिंग, केमिकल आणि औषध निर्मिती, जेम्स ॲण्ड ज्वेलरी या विषयातल्या संधी, यावर चर्चासत्रं होणार आहे. विविध क्षेत्रातले २०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. यावेळी उद्योगराज्यमंत्री आदिती तटकरे, उद्योग सचीव आदी मान्यवर उपस्थित होते.