मुंबई (वृत्तसंस्था) : वाशिम जिल्ह्यात चार दिवसाच्या विश्रांती नंतर काही ठिकाणी पुन्हा एकदा काल रात्री पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सोयाबीन काढणीचा हंगाम नुकताच सुरू झाला असून या पावसाने सोयाबीन सोंगणीला उशीर होणार असून काढलेल्या सोयाबीनची प्रत घसरण्याची शक्यताही आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल संध्याकाळनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली. सोलापूर जिल्ह्यातही काल संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे रब्बी हंगामाला चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. चंद्रपूर जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु झाला.जवळपास दोन तास सुरु असलेल्या या पावसाने नाले भरल्यामुळे वाहतुकीला खोळंबा झाला. गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार धरणामधुन सध्या ५४०० क्युमेकचा विसर्ग सुरू आहे. यात दुपारी १२ वाजल्या पासुन सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७००० ते ८००० क्युमेकपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नदीपात्राजवळील गावांना सावध राहण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर आणि पूर्णा तालुक्यात काल रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. पुर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून आज सकाळी सव्वा दहा वाजल्यापासून आणखी दोन दरवाजे उचलून पूर्णा नदीच्या पात्रात पाणी सोडले जात आहे. सध्या एकूण ३१५.४४ क्यूमेक एवढा विसर्ग चालु आहे.धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल, त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असे आवाहन येलदरी धरण पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे. गडचिरोली, उस्मानाबाद तसंच अकोल्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे.