Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनाडाइन्सच्या पंतप्रधानांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

नवी दिल्ली : सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनाडाइन्सचे पंतप्रधान डॉ. राल्फ एव्हरार्ड गोन्साल्विस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनाडाइन्सचे पंतप्रधान म्हणून प्रथमच भारत भेटीवर आलेले गोन्साल्विस काल नवी दिल्लीत सुरु असलेल्या वाळवंटीकरण विरोधातील संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेच्या उच्च स्तरीय सत्रात सहभागी झाले होते.

पंतप्रधान गोन्साल्विस यांनी सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनाडाइन्स आणि कॅरिबिअन आणि लॅटिन अमेरिका प्रांतात भारताप्रति असलेली अपार सद्भावना नमूद केली. या प्रांतांबरोबर भारताचे विकासात्मक सहकार्य आणि नैसर्गिक आपत्ती प्रसंगी भारताच्या त्वरित मदतीची त्यांनी प्रशंसा केली.

पंतप्रधान मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन्ही देशांमधील दृढ सहकार्य नमूद करत  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा  अस्थायी सदस्य म्हणून निवडला गेलेला “आतापर्यंतचा सर्वात छोटा देश” बनल्याबद्दल सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सचे अभिनंदन केले.

उभय देशांमध्ये कौशल्य विकास, प्रशिक्षण, शिक्षण, वित्त, संस्कृती आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत सहमती दर्शवली.

Exit mobile version