महाजनको वीज निर्मिती केंद्रामध्ये कोळसा उपलब्ध होण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे नितीन राऊत यांचे निर्देश
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : पावसाळ्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महाजनकोच्या वीज निर्मिती केंद्रामध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने त्वरीत योग्य प्रमाणात कोळसा उपलब्ध होण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल महाजनकोला दिले आहेत. राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाअंतर्गत कार्यरत महानिर्मितीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमधील कोळशाच्या उपलब्धतेचा राऊत यांनी काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळेस महानिर्मितीकडे उपलब्ध कोळसा आणि तो वाढवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न यांची माहिती एका सादरीकरणाद्वारे देण्यात आली. केंद्र सरकारच्या वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडसह अन्य कोळसा कंपन्यांकडून ठरल्याप्रमाणे कोळसा मिळत नसल्यानं निर्माण झालेल्या टंचाईवर मात करण्यासाठी वेकोलीकडे नियमित कोळसा पुरवठ्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देशही राऊत यांनी या बैठकीत दिले.