जगाच्या कल्याणासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात मैत्रीचे दृढ संबंध असणं आवश्यक – प्रधानमंत्री
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांची भेट घेतली. कोरोना विरोधातली लढाई, पर्यावरण बदल आणि हिंद प्रशांत क्षेत्रातलं स्थैर्य या मुद्यांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. कोरोनाच्या आव्हानाचा सामना करताना अध्यक्ष बायडन आणि अमेरिकेनं पार पाडलेल्या भूमिकेचं मोदी यांनी कौतुक केलं. जगाच्या कल्याणासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात मैत्रीचे दृढ संबंध असणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं. पुढच्या आठवड्यात महात्मा गांधी जयंती आहे, त्याचा उल्लेख करत बायडन यांनी सर्व जगासमोर गांधीजींच्या विचारांचा आदर्श असल्याचं सांगितलं. याच धागा पकडत मोदी यांनी, जगाचे विश्वस्त बनून राहण्याबद्दल गांधीजी बोलत असत, असं सांगितलं. ही विश्वस्तपणाची भावना बरोबर घेऊनच भारत आणि अमेरिकेनं जगाच्या कल्याणासाठी काम करायला हवं, असं मोदी म्हणाले.