मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा, नद्यां- नाल्यांना पूर
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मराठवाड्यासह राज्यातल्या इतर काही जिल्ह्यांना मोठा काही ठिकाणी तडाखा बसला. जोरदार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. शेकडो जनावरंही पाण्यात वाहून गेली असून पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
यवतमाळमध्ये इसापूर धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाचे ११ दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे उमरखेड तालुक्यात यामुळे दहागांव नाल्याला आलेल्या पूरात नांदेड हुन नागपूर कडे जात असलेली राज्य परिवहन महामंडळाची बस वाहून गेली. यामध्ये वाहक आणि चालकासह ६ जण होते. त्यातल्या दोन प्रवाश्यांनी स्वतःची सुखरुप सुटका करून घेतली, मात्र बचाव पथकाला एका प्रवाशाचा मृतदेह सापडला. झाडाचा आधार घेतेल्या एका प्रवाशाच्या सुटकेचे प्रयत्न अद्यापही सुरु आहेत. तर दोघे जण अजूनही बसमध्ये अडकले असल्याचं स्थानिक तहसिलदारांनी सांगितलं.
उस्मानाबादेत काल रात्रीनंतर मुसळधार पाऊस झाला. मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तेरणा नदीला पूर आला असून, इरला रामवाडी, दाऊतपुर या चार गावात पुराचं पाणी शिरलं. जिल्ह्यात ३१ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. कळंब तालुक्यात वाकडी इथं १७ तर सौंदना आंबा इथं ८ जण, तर दाऊतपुर इथं एकाच कुटुंबातले ६ जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं पथकाकडून या सगळ्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु आहेत. इरला इथल्या दीडशे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.
सोलापूरात उत्तर सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, पंढरपुर, दक्षिण सोलापूर या तालुक्यांध्ये जोरदार पाऊस झाला. पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी घरांची पडझड झाली, तर अनेक ठिकाणी रस्तेही वाहून गेले आहेत. पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं पशुधनाचंही मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालन्यात १२ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. नदी-नाल्यांना पूर आल्यानं अनेक भागांमधली पिकं पाण्याखाली गेली आहेत. सकाळी शहरातल्या एका भागात घराची भिंत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
बुलडाणा जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. सततच्या पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणीपातळी प्रचंड वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी नदी आणि ओढ्यांवरचे पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातले बहुतांश प्रकल्प क्षमतेपेक्षा जास्त भरल्यानं खडकपूर्णा सह अनेक जलाशयांमधून नदीपात्रांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कदमापूर गावात अंगावर वीज कोसळल्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
हिंगोलीतही काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. कयाधू नदीला पूर आल्यानं कळमनुरी तालुक्यातला उमरा फाटा ते बोल्डा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. पूरस्थितीमुळे ठिकठिकाणची रस्ते वाहतूक ठप्प झाल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. औढा तालूक्यात पूरजळ येथलं आरोग्य उपकेंद्रातही पाणी शिरलं आहे.
नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला पुरानं वेढल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. नांदेड शहरात लातूर फाटा रस्त्यावर पाणी साचल्यानं अनेक दुकानांचं नुकसान झालं. अर्धापूर तालुक्यात उमा नदीला पूर आला असून बामणी, शेलगाव, पिंपळगाव महादेव इथलं कापणीला आलेलं सोयाबीनचं पिक पाण्याखाली गेलं आहे. पूरस्थितीमुळे शेलगाव, बामणी या गावांचा संपर्क तुटला आहे.
बीड जिल्ह्यात आवरगावचा पूल वाहून गेल्यानं धारूर – आडस रस्ता बंद झाला आहे. परळी ते बीड रस्त्यावर पांगरी नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यानं, पाचशे वाहनं अडकली आहेत. मांडवा पुलावरुनही पाणी वाहत असल्यामुळे औरंगाबादकडे येणारा रस्ता बंद झाला आहे. याविषयी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अधिक माहिती दिली.
औरंगाबादेत रात्री मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अंजना नदीला पूर आला आहे. सिल्लोड तालुक्यातल्या बोरगाव बाजार परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. धुळे जिल्ह्यात धुळे, साक्री, शिरपूर, दोंडाईचा भागात काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. आज पहाटेनंतर पावसानं जोर धरला. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचून नाल्यांना पूर आला आहे.
जळगावमध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे वाघूर धरण पूर्ण भरल्यानं, धरणाच्या १० दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. प्रशासनानं नदीगाकाठच्या गावांना सतर्क राहायचा इशारा दिला आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातले हिवरा, अग्नावती, मंगरूळ आणि तोंडापूर हे मध्यम प्रकल्पही शंभर टक्के भरले आहेत.
वाशिम जिल्ह्यात गेले दोन दिवस संततधार पाऊस सुरु आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातलं बहुतांश शेती पाण्याखाली गेली आहे. सोयाबीनच्या पिकाचं मोठं नुकसान झालं असून, अनेक ठिकाणी सोयाबीनला पुन्हा कोंब फुटु लागले आहेत.
नाशिक जिल्ह्यातही बहुतांश भागात पावसाचा जोर आहे. आज सकाळी गंगापूर धरणातून २ हजार क्यूसेक, दारणा धरणातून ५५०, वालदेवीतून १८३, कश्यपीतून १५० तर नांदूरमाध्यमेश्वर मधून २ हजार ४२१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परभणीत जोरदार पावसामुळे सोनपेठ तालुक्यात वाण नदिला पूर आला आहे. नागापूरकर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं धार डिघोळ गावाला पाण्याचा वेढा पडला आहे.
अकोल्यातही आज सकाळ पासून पावसाला सुरुवात झाली. मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई परिसरात काल संध्याकाळपासूनच ढगाळ वातावरण असून अधून मधून पावसाच्या सरी बरसत आहेत. दरम्यान आताच हाती आलेल्या वृत्तानुसार यवतमाळ जिल्ह्यात वाहून गेलेल्या एसटी मध्ये चालक आणि वाहकासह एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघांना वाचविण्यात यश आलं आहे. यामध्ये एकूण ५ प्रवासी होते.